नाशिक | आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची संख्या गेल्या वेळेपेक्षा दहा पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला गरज भासल्यास ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदे’च्या माध्यमातून १० हजार डॉक्टरांची सेवा आणि अन्नदानासाठी धान्य उपलब्ध करून देण्याची तयारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दर्शवली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त शुक्रवारी (दि.१३) नाशिकमध्ये त्यांचे आगमन झाले होते. यादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कुंभमेळा नियोजनाबाबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
कुंभमेळा नियोजन आणि गर्दी नियंत्रण
कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बोलताना डॉ. तोगडिया यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे यंदाच्या नाशिकच्या कुंभमेळ्यात १० पट अधिक गर्दी होण्याचा अंदाज आहे. या प्रचंड गर्दीचे नियंत्रण करणे, स्वच्छता राखणे आणि अफवा रोखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. भाविकांना कमी चालावे लागेल अशा पद्धतीचे योग्य नियोजन केल्यास गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल. प्रयागराजच्या कुंभापासून ‘हनुमान चालीसा सप्ताह’ सुरू करण्यात आला असून, लाखो गावांतील या केंद्रांचे आता ‘आरोग्य केंद्रां’मध्ये रूपांतर केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य मोहीम आणि राजकीय भूमिका
या आरोग्य मोहीमेशी १० हजार डॉक्टर जोडले गेले असल्याचे सांगत, रक्तदाब, मधुमेह आणि सांधेदुखीसारखे आजार कमी औषधांत नियंत्रित ठेवता येतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘एक मूठभर धान्य’ अभियानांतर्गत एक कोटी गरीब कुटुंबांना धान्य पुरवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत तरुणांना आणि नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु आंदोलनाला कोणतेही हिंसक वळण लागू नये, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीच्या काळात पक्ष असतात परंतु इतर वेळी सर्वजण हिंदू असतात, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले.
Source: Cosmo News Desk





