मुंबई | क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान राज्यात जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
शिबिराची वेळ आणि ठिकाण
हे विशेष शिबिर १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथे हे शिबिर पार पडणार आहे.
उपलब्ध सुविधा आणि कागदपत्रे
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी, तसेच आधार कार्डवरील नावातील दुरुस्ती, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय बायोमेट्रिक माहिती देखील अद्ययावत करता येईल. प्रामुख्याने नोकरी व शिक्षणासाठी मुंबईत राहणाऱ्या जनजातीय बांधवांना आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. आधार अद्ययावतीकरणासाठी येताना नागरिकांनी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखे ओळखीचे प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत आणणे बंधनकारक आहे. जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाअंतर्गत आयोजित या शिबिराचा मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk











