Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये बेझे धरणात बुडून वडील व दोन मुलींचा मृत्यू
Nashik

नाशिकमध्ये बेझे धरणात बुडून वडील व दोन मुलींचा मृत्यू

नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा पाण्यात बुडून अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाऊबीजेच्या दिवशी घडली दुर्दैवी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील वाघेरा येथील रहिवासी असलेले आणि सध्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण फाटा येथील तिसगाव नाका परिसरात राहणारे कुटुंब त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील माहेरवासीणीकडे भाऊबीजेच्या सणासाठी आले होते. बुधवारी (दि. ११) सकाळी १० च्या सुमारास हे कुटुंब बेझे धरणावर फिरायला गेले होते.

फिरत असताना कुटुंबातील दोन्ही मुली, ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्पदा सुरेश भोर (वय ७) या धरणाच्या पाण्यात उतरल्या. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही मुली पाण्यात बुडायला लागल्या. मुलींना पाण्यात बुडताना पाहून त्यांचे वडील सुरेश नामदेव भोर (वय ४४) यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.

ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले मृतदेह

पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे वडील सुरेश भोर हेदेखील पाण्यात बुडाले. ही बाब जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच एकच धावपळ उडाली. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोहणाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले.

स्थानिक पोहणाऱ्यांनी पाण्यात शोध घेतला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. भाऊबीजेच्या आनंदात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मृत कुटुंबाच्या नातेարक आणि परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts