नाशिक | नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मालेगाव येथून सिमेंट घेऊन जाणारा हा ट्रक भिवंडीच्या दिशेने निघाला होता. प्रवासात चालकाने काही प्रवाशांना ट्रकच्या केबिनमध्ये बसवले होते. पहाटेच्या सुमारास घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगतच्या मोठ्या दरडीवर जाऊन आदळला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले होते. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक दरीच्या दिशेने न वळवता दरडीच्या दिशेने वळवल्यामुळे ट्रक दरीत कोसळण्याची मोठी दुर्घटना टळली.
अपघातात वाहक मृत, अकरा प्रवासी जखमी
या दुर्घटनेत ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रकमधून प्रवास करणारे शबान अब्दुल शेख, शकील खलील शेख, जकिरा करीम सय्यद, अफसाना सय्यद, वसीम करीम सय्यद, अलिशा सय्यद, महोम्मद सय्यद, वारीस सय्यद, मुस्कान सय्यद, अनम अन्सारी आणि शकील अन्सारी हे ११ जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीकडून कोणतीही मदत उपलब्ध झाली नसल्याचा आरोप करण्यात आला असून, प्रवाशांना मदत करण्यासाठी खासगी वाहनचालकांची मदत घ्यावी लागली.
प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि कसारा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तसेच घोटी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची मदत घेतली. या प्रकरणी कसारा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. मालेगाव, धुळे आणि नाशिक येथून मुंबईकडे जाणारे अनेक प्रवासी पैसे आणि वेळ वाचविण्याच्या उद्देशाने अशा मालवाहू वाहनांमधून प्रवास करत असल्याचे समोर आले असून, हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे.
Source: Cosmo News Desk







