जालना | राज्यात दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले असताना शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये आणि खचून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जालना तालुक्यातील भिलपुरी येथील दुष्काळग्रस्त शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट देऊन त्यांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. या प्रसंगी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही आणि सरकार त्यांच्या पाठिशी खंबीर उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध उपाययोजना
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तांगडे कुटुंबीयांशी संवाद साधत शेतीची परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शासकीय मदतीची माहिती घेतली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा म्हणून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अनेकांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. याशिवाय दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नुकसान भरपाई, पीक कर्जाचे पुनर्गठन, सक्तीच्या वसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्कात सवलत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांसारख्या बारा कलमी सवलतींची अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा आणि अन्नधान्य उपलब्ध राहण्यासाठी शासन नियोजन करत आहे.
कुटुंबाला आधार आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी
अंबादास तांगडे यांच्या कुटुंबाची बिकट परिस्थिती जाणून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मुलीशी संवाद साधला. तिला पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे समजल्यानंतर तिच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार असून, महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, विद्यार्थिनींना सायकली आणि गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वाटप करण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. भाऊबीजेनिमित्त मंदाबाई तांगडे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे औक्षण केले तर उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला कपडे भेट दिले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Source: Cosmo News Desk










