नाशिक | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर गोदावरी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाची निष्क्रियता समोर आली आहे. नंदिनी नदीत विषारी सांडपाणी सोडले जात असेल, तर ते पुढे गोदावरीत मिसळताना पाणी आपोआप कसे शुद्ध होणार, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला केला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. प्रदूषणाच्या मुद्द्यावर बैठका आणि इतिवृत्तांचा फार्स नको, तसेच गेल्या १२ वर्षांत न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा जाब न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. याप्रकरणी मुख्य सचिवांना चार ओळींचे स्पष्ट प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत २१ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
प्रकल्प रखडल्याबद्दल नाराजी आणि औद्योगिक प्रदूषण
अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी रोखण्यासाठी २५० कोटी रुपयांच्या एसटीपी प्रकल्पाचा प्रस्ताव कागदावरच असून प्रत्यक्ष कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. एमआयडीसीचा दोन तृतीयांश आणि महापालिकेचा एक तृतीयांश आर्थिक वाटा निश्चित असतानाही प्रकल्प रखडल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अंबड-दत्तनगर परिसरातील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण ५०.३ मिलिग्रॅम प्रतिलिटर आढळल्याचा चाचणी अहवाल याचिकाकर्त्यांनी सादर केला. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा हे प्रमाण हजारपट अधिक असल्याचे समोर आले असून, या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांची छायाचित्रे न्यायाधीशांनी सरकारी वकिलांच्या हातात देत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
रामकुंड परिसरातील बांधकामे आणि प्रतिज्ञापत्राचे आदेश
रामकुंड परिसरातील नदीपात्र, ब्लू व रेड लाइनमधील कथित अनधिकृत बांधकामे, टॉवर आणि मेकॅनिकल गेट्सचा मुद्दाही सुनावणीत गाजला. या प्रकरणावर महापालिकेला २१ नोव्हेंबरपूर्वी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गोदावरी प्रदूषण आणि अतिक्रमणांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. महापालिकेने उपनदीत सांडपाणी सोडायचे आणि मुख्य पात्रात प्रदूषण नाही असे सांगून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
Source: Cosmo News Desk






