नाशिक | सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आलेला असताना गोदावरी नदी प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले. प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी तीन वेळा आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत, राज्य सरकारने गुरुवार सादर केलेल्या स्पष्टीकरणावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. निखिल पुजारी यांनी ही माहिती दिली आहे.
पाण्याचे नमुने आणि चिंताजनक अहवाल
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी गोदावरी – कपिला संगम, तपोवन, गोदावरी नदीचा आग्रा महामार्ग परिसर, नांदूर – दसक तसेच समतानगर आणि टाकळी परिसरातून पाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांचे अहवाल १९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले. त्यात तिन्ही ठिकाणच्या पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण शून्य आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. प्रदूषणाची ही गंभीर स्थिती लक्षात घेता न्यायालयाने यापूर्वीच तीव्र चिंता व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. राज्य सरकारच्या वतीने ॲड. ओ. ए. चांदेकर यांनी, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. निखिल पुजारी यांनी बाजू मांडली. मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत २०१३, २०१७ आणि २०१८ मधील आदेशांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केला.
अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश
केवळ प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची घोषणा करून चालणार नाही, तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. यापूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणारे तसेच गोदावरी प्रदूण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे पदनाम सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा ठोस कृती आराखडा, त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल आणि प्रदूण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावे व पदांसहित माहिती २१ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतीत राज्य सरकारला ठोस कृती अहवाल आणि प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.
Source: Cosmo News Desk






