मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एका चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. या प्रकरणांशी संबंधित ज्या व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी किंवा नोंदणीकृत संस्थांकडे माहिती, पुरावे किंवा तक्रारी आहेत, त्यांना आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत.
निवेदन सादर करण्याची प्रक्रिया आणि नियम
संबंधित व्यक्तींनी आपली निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करणे अनिवार्य आहे. निवेदनांमध्ये स्पष्टता राहावी यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचा एक निश्चित नमुना उपलब्ध करून दिला आहे. संबंधितांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत नोटराईज्ड प्रतिज्ञापत्रासोबत आपली निवेदने आयोगाकडे पाठवायची आहेत. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे देखील आवश्यक आहे. प्रत्यक्ष किंवा टपाला द्वारे कागदपत्रे अन्न व औषध प्रशासन भवन, दालन क्र.२०१, दुसरा मजला, बीकेसी वांद्रे, (पूर्व), मुंबई-५१ या पत्त्यावर पाठवता येतील.
ई-मेलद्वारे कागदपत्रे पाठवण्याची सुविधा
नोटाराईज्ड प्रतिज्ञापत्र, मूळ निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेल पत्त्यावर देखील पाठवणे आवश्यक आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात काही अडचण आल्यास किंवा आवश्यक माहिती व मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Source: Cosmo News Desk










