मुंबई | चालू आर्थिक वर्षातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर आणि पशुधनासमोर उभी राहिलेली चारा टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसात झालेली तूट, असमान वितरण, खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट आणि रब्बी हंगामातील संभाव्य कमी पेरणी क्षेत्र यामुळे पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर मोठा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने राज्यभरात चारा उत्पादनाला गती देण्याचे ठरवले आहे.
चारा बियाणे व लागवड नियोजन
दुष्काळजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी गठीत केलेल्या अभ्यासगटाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आपला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या शिफारसीनुसार कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रब्बी हंगाम २०२६ मध्ये चारा बियाण्याची कमतरता भासू नये म्हणून कृषी आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने जिल्हानहाय व पिकनिहाय बियाण्यांची मागणी निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, आय.सी.ए.आर., के.व्ही.के. यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरी, न्यूट्रीफीड आणि शुगरग्रेझ यांसारखी कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि बहुकापणी चारा पिके घेण्यास प्राधान्य देण्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रामध्ये चारा पिकांची लागवड वाढवण्यासाठी बियाणे, खतांचा संतुलित वापर आणि पाणी व्यवस्थापनाबाबत कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल.
शासकीय जमिनींवर चारा लागवड आणि यंत्रसामग्री नियोजन
कृषी विद्यापीठे, तालुका बीज गुणन केंद्रे आणि महाबीज यांच्या अधिपत्याखालील उपलब्ध जमिनींवर रब्बी हंगामात मका, न्यूट्रीफीड, शुगरग्रेझ, ज्वारी आणि बाजरी या चारा पिकांची प्राधान्याने लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हायड्रोफोनिक, अझोला व बिनकाटेरी निवडून लागवड यांसारख्या पर्यायी स्रोतांद्वारे चारा उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठांनी मोहिम स्वरूपात कार्यक्रम राबवावा. विद्यापीठे व बीज गुणन केंद्रांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक चारा लागवड प्लॉट विकसित करून शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कस्टम हायरींग सेंटर व कृषी औजारे बँकेकडील यंत्रसामग्रीची माहिती शेतकऱ्यांना आणि पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून चारा कापणीचे नियोजन सुलभ होईल. या सर्व उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे विविध स्तरांवर नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
Source: Cosmo News Desk










