मुंबई | राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक गुणवत्तापूर्ण, लोकाभिमुख आणि बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. येत्या १ नोव्हेंबरला नांदेड येथून आरोग्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेचा अधिकृत प्रारंभ होईल आणि ही मोहीम ५ डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यभर सुरू राहणार आहे. या विशेष यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट सर्वसामान्यांशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाच्या अभियानाशी या यात्रेची जोड देण्यात आली असून, यादरम्यान शुद्ध पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पोषण आहार, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांवर नियंत्रण आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या विषयांवर व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवर लोकांचा सहभाग वाढवणे हा देखील या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि समित्यांसोबत बैठका
या सर्वसमावेशक आरोग्य संवाद यात्रेत राज्यभरात एकूण १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण केले जाणार आहे. यात्रेदरम्यान जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती तसेच ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यांपैकी किमान एका समितीसोबत विशेष बैठक आणि चर्चा आयोजित केली जाईल. यादरम्यान शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी देखील केली जाईल. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी झालेल्या शाळा आणि अंगणवाड्यांना भेट देऊन या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयांना भेट देऊन तेथील खासगी डॉक्टर आणि उपचारा L घेतलेल्या रुग्णांसोबत संवाद साधला जाईल. याशिवाय पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल रुग्ण, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजना लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले नागरिक यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला जाणार आहे.
आरोग्य सेवांचा आढावा आणि अधिकाऱ्यांचा सहभाग
नागरिकांना आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ किती प्रमाणात मिळतो, आरोग्य संस्थांमधील सुविधा आणि रुग्णसेवेतील अडचणी यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. तसेच आरोग्य उपकेंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, स्त्री मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सर्व सेवांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांच्या गरजा समजून घेऊन, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि त्यांच्या सूचनांनुसार सुधारणा घडवणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या सर्व मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.
Source: Cosmo News Desk











