Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा लाभ वितरित
Maharashtra

पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा लाभ वितरित

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेले अधिकारी

पुणे | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत एकूण १ हजार ९३७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील सुमारे ४ लाख ३४ हजार शेतकरी सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, गुजरातमधील बनासकांठा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय याप्रसंगी कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक उदय देशमुख आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे उपस्थित होते.

योजनेचा उद्देश आणि निकष

शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी आर्थिक मदत व्हावी, कृषी निविष्ठांची खरेदी सुलभ व्हावी आणि शेतीचे उत्पादन वाढीस लागावे यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात दिली जाते. वर्ष २०१९ पासून पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २३ हप्त्यांच्या माध्यमातून निधी मिळाला असून, आता २४ वा हप्ता जमा करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण ५ लाख ७६ हजार २७९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, त्यातील ४ लाख ३४ हजार ३२७ लाभार्थी सध्या पोर्टलवर पात्र आहेत.

नोंदणी आणि तालुकावार वितरण

नियमितपणे लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे, ई-केवायसी पूर्ण करणे, बँक खाते आधारशी जोडणे आणि शेतकरी ओळख क्रमांकाची पूर्तता करणे गरजेचे आहे. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने डीबीटी पद्धतीने हा निधी दिला जातो. आंबेगाव तालुक्यात ३७ हजार २३१ लाभार्थी व १५१ कोटी, बारामतीत ५० हजार ७३१ लाभार्थी व २३० कोटी, भोरमध्ये २५ हजार १३७ लाभार्थी व १०४ कोटी, दौंडमध्ये ४२ हजार ४२० लाभार्थी व १९५ कोटी, हवेलीत १० हजार ९५३ लाभार्थी व ५६ कोटी रुपये वितरित झाले आहेत. तसेच इंदापूरमध्ये ४८ हजार ७४० लाभार्थी व २१९ कोटी, जुन्नरमध्ये ५२ हजार २८१ लाभार्थी व २३१ कोटी, खेडमध्ये ४३ हजार ६३३ लाभार्थी व २०० कोटी, मावळमध्ये १७ हजार ४९६ लाभार्थी व ७७ कोटी, मुळशीत १३ हजार ५५ लाभार्थी व ७१ कोटी, पुरंदरमध्ये ३२ हजार १०८ लाभार्थी व १३३ कोटी, शिरूरमध्ये ५१ हजार ५०८ लाभार्थी व २२९ कोटी आणि वेल्हा तालुक्यात ९ हजार ३४ लाभार्थी व ४० कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts