Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करण्यावर शासनाचा भर
Maharashtra

राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना सक्षम करण्यावर शासनाचा भर

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची बैठक

मुंबई | राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांना अधिक सक्षम करणे, त्यांच्या विविध समस्यांचे निवारण करणे आणि कारागिरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे या उद्देशaने शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी प्रशिक्षण संस्था येथे महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एका राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी बोलताना सभापती रवींद्र साठे यांनी स्पष्ट केले की, बलुतेदार सहकारी संस्था या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा कणा आणि अविभाज्य भाग आहेत. आर्थिक विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी या सर्व संस्थांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. माजी विधान परिषद सभापती वि. स. पागे यांच्या पुढाकारातून राज्यात १९७२ पासून तालुका आणि ग्रामीण स्तरावर कारागीर रोजगार हमी योजना राबवली जात आहे. या योजनेमार्फत बलुतेदार सहकारी संस्थांच्या माध्यमातून कारागिरांना रोजगार मिळवून दिला जातो. या संस्थांचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी मंडळाच्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, राज्यातील सर्व बलुतेदार सहकारी संस्थांनी आपली परिपूर्ण माहिती, सद्यःस्थिती, अडचणी आणि आवश्यक सहकार्याबाबतचा सविस्तर अहवाल मंडळाकडे सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

योजनांचा लाभ आणि संस्थांचे सक्षमीकरण

बैठकीत बोलताना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी सांगितले की, बलुतेदार सहकारी संस्था या तळागाळातील गरजू, वंचित आणि मागास कारागिरांसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. या संस्थांना पूर्णपणे सक्षम करण्यासाठी त्यांच्या सर्व समस्या शासनस्तरावर मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कारागिरांसाठी रोजगारनिर्मिती वाढवण्याच्या दृष्टीने मंडळाच्या विशेष घटक योजना आणि मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेचा लाभ देऊन या संस्थांना पुन्हा बळकट करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय, संस्थांच्या कामकाजावर योग्य देखरेख ठेवण्यासाठी मंडळाच्या उद्योग पर्यवेक्षकांना सहकार्य करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीतील विविध विषयांवर चर्चा आणि उपस्थितमान

या राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील बलुतेदार सहकारी संस्थांसमोरील अडचणी, कामकाजातील अडथळे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, हातकागद विभागाचे अमर राऊत यांच्यासह महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले बलुतेदार सहकारी संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी देखील या चर्चेमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र बलुतेदार सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष पाटोळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. कुंभार यांनी केले, तर आभारप्रदर्शन अंकुश आंबेकर यांनी मानले.

Source: Cosmo News Desk

Related Posts