Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार: सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान
Maharashtra

राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार: सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान

सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा आणि राष्ट्रीय एकता दिवस

महाराष्ट्र | भारताची विविधता हीच देशाची ताकद आहे. भाषा, संस्कृती, परंपरा आणि धर्म वेगवेगळे असले तरी देश एक आहे. ही एकात्मता दूरदृष्टी, संघटन कौशल्य, बंधुता आणि निर्णयक्षमतेने टिकवून ठेवणारे नेतृत्व म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल होय. त्यांची जयंती ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने २०१४ मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र शासनाने २२ ऑक्टोबर २०१४ रोजी याची घोषणा केली, तर २४ ऑक्टोबर २०१४ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी केले. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिला राष्ट्रीय एकता दिवस साजरा झाला. महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी आदेश काढून शैक्षणिक संस्थांमध्ये वक्तृत्व, निबंध, नाटीका आणि व्याख्याने आयोजित करून राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांचे नेतृत्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. वकिलीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या प्रभावातून सार्वजनिक जीवन स्वीकारले. १९१८ मधील खेडा सत्याग्रह त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा टप्पा होता. पिकांचे नुकसान आणि महसूल भरण्याच्या समस्येवर त्यांनी शेतकऱ्यांचा संघटित लढा उभारला. १९२८ मधील बारडोली सत्याग्रहाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. महसुलाच्या वाढीव आकारणीविरोधात त्यांनी शिस्तबद्ध आणि अहिंसक संघर्ष केला, ज्यामुळे त्यांना शेतकऱ्यांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. अहमदाबाद नगरपालिकेत स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुधारणांमध्ये त्यांनी प्रशासकीय कौशल्य दाखवले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत आणि १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि कारावासही भोगला.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलीनीकरण

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर ५६० हून अधिक संस्थानांच्या विलीनीकरणाचा आणि राजकीय एकात्मतेचा प्रश्नंसमोर होता. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांनी व्ही. पी. मेनन यांच्या सहकार्याने चर्चा, समजूत, मुत्सद्देगिरी आणि ठाम निर्णयांचा वापर करून संस्थानांना भारतीय संघराज्यात सामील केले. जुनागढच्या प्रश्नावर त्यांनी निर्णायक भूमिका घेतली. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणासाठी सप्टेंबर १९४८ मध्ये ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलीस कारवाई करण्यात आली आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. अखिल भारतीय सेवांच्या बळकटीकरणातून त्यांनी प्रशासकीय चौकट सक्षम केली. राष्ट्रीय एकतेची जबाबदारी आणि अखंडता जपण्यासाठी त्यांची जयंती हा संकल्पाचा दिवस मानला जातो.

Source: Cosmo News Desk

Related Posts