मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’ हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्त्रीच्या कष्टांची, स्वप्नांची, संघर्षाची आणि कर्तृत्वाची ओळख करून देणारे हे प्रदर्शन स्त्रीजीवनाचे अनेक अनोखे पैलू उलगडते. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्रिमूर्ती प्रांगणात खुले असणार आहे.
प्रदर्शनातील विविध विषय आणि छायाचित्रफलक
या प्रदर्शनात जवळपास १५ छायाचित्रफलक मांडण्यात आले आहेत. प्रत्येक फलक एका महिलेचा संघर्षमय प्रवास उलगडत तिची जिद्द, कर्तृत्व आणि प्रगतीची वाट दर्शवतो. ‘अमोल’ विषयातून घरकामात राबणाऱ्या स्त्रियांच्या श्रमांचे मोल अधोरेखित होते, तर ‘चौकटीबाहेर’ विषयातून ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, बांधकाम आणि लेथ मशीनसारख्या कामांत आत्मविश्वासाने वावरणाऱ्या महिलांचे चित्र दिसते. ‘जिगरबाज’ आणि ‘स्वयंपूर्ण’ या छायाचित्रातून स्त्रीच्या धाडसाची व स्वावलंबनाची जाणीव होते. ‘लगोरी’ आणि ‘तांबड्या माती’ या विषयांतून खेळणाऱ्या मुली आणि कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या बालिकांचे चित्र पारंपरिक समजुतींना छेद देते. तसेच डोंबाऱ्याच्या खेळात कसरत करणाऱ्या चिमुरडीचे छायाचित्र बालपणाचा, शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा विचार करायला भाग पाडते. ‘अबला की सबला’, ‘सहजीवन’, ‘जगण्यासाठी गुंफण’, ‘शी बॉक्स’, आणि ‘पंढरीच्या वाटेवर’ यांसारख्या विविध विषयांतून महिलांची सुरक्षितता, कायदेशीर तरतुदी, वारकरी महिलांच्या प्रवासातील सुविधा आणि ग्रामीण भागातील महिलांच्या एकजुटीचे दर्शन घडते.
विशेष रचना आणि कवितांचा संगम
या छायाचित्र प्रदर्शनाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पारंपरिक नसून ‘वॉक-इन’ स्वरूपाचे प्रदर्शन आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना प्रत्यक्ष प्रवेश करून अनुभव घेता येतो, असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी सांगितले. या प्रदर्शनात प्रत्येक छायाचित्रासोबत कवी आणि कवयित्रींच्या कविता गुंफण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रज्ञा दया पवार, सुमती लांडे, कल्पना दुधाळ, संजीवनी बोकील, अजय कांडर, प्रकाश होळकर तसेच संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, नारायण सुर्वे आणि अरुण काळे यांच्या कवितांचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या निर्मितीत संदेश भंडारे (संकल्पना व छायाचित्रे), वर्षा कुलकर्णी (शब्दांकन), उदय ओक (इंग्रजी अनुवाद), अजय कांडर (कविता निवड), सिद्धार्थ सहाय्य व जितेंद्र कळसकर (प्रदर्शन रचना), आणि प्रभाकर भोसले व किशोरी गद्रे (सुंदरलेखन) यांनी सहभाग घेतला आहे.
Source: Cosmo News Desk









