मुंबई | राज्य बालविवाह मुक्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, छत्रपती संभाजीनगर येथे १४ वर्षीय युक्ती (नाव बदलण्यात आले आहे) या बालिकेचा २९ नोव्हेंबर रोजी ठरलेला बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि त्यांच्या पथकाने वेळीच हस्तक्षेप करून यशस्वीरीत्या रोखला आहे. बॉम्बे व्हिजिलन्स असोसिएशनच्या बालिकाश्रमाच्या अधीक्षिकांनी दाखविलेली सतर्कता, चाईल्ड हेल्पलाइन १०९८ तसेच संबंधित यंत्रणेच्या समन्वयातून हा बालविवाह थांबविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
बालविवाहाची माहिती आणि तात्काळ हस्तक्षेप
युक्ती ही २१ मार्च २०१८ रोजी बॉम्बे व्हिजिलन्स असोसिएशनच्या बालिकाश्रमात दाखल झाली होती. त्यानंतर २६ जून २०२४ रोजी तिला कायमस्वरूपी तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते, परंतु संस्थेच्या अधीक्षिका तिच्या सतत संपर्कात होत्या. दरम्यान, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेच्या अधीक्षिकांना तिच्या भावाच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विवाहाची लग्नपत्रिका निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संस्थेच्या नोंदवहीतील माहिती तपासली असता युक्ती हिचे वय अवघे १४ वर्षे असल्याचे उघडकीस आले. ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच अधीक्षिकांनी तातडीने चाईल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधून याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनच्या वाघमारे यांनी संस्थेशी संपर्क साधून बालिकेच्या सध्याच्या राहत्या पत्त्याची माहिती मिळवली. संबंधित यंत्रणेने २६ नोव्हेंबर रोजी तिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक तो हस्तक्षेप केला आणि हा प्रस्तावित बालविवाह थांबविला. संस्थेच्या अधीक्षिकांची सतर्कता आणि चाईल्ड हेल्पलाइन तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पथकाने केलेल्या समन्वयामुळे एका अल्पवयीन बालिकेचे बालपण आणि भविष्य सुरक्षित होण्यास मदत मिळाली आहे. नागरिकांनीही अशा घटनांमध्ये सतर्क राहून बालविवाहाची माहिती तातडीने यंत्रणेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाहाचे कायदेशीर नियम आणि दुष्परिणाम
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे कायदेशीररीत्या आवश्यक आहे. या वयापूर्वी विवाह करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा ठरतो. बालविवाह घडवून आणणाऱ्या व्यक्तींना दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहते, तसेच अल्पवयीन मातृत्वामुळे माता व बालकाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. याशिवाय शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊन कौटुंबिक हिंसाचार आणि आर्थिक परावलंबित्वाचा धोका वाढतो आणि मुलींचे बालपण व स्वातंत्र्याची संधी हिरावली जाते.
बालविवाहाची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी किंवा पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. मुलीचे वय अधिकृत कागदपत्रांद्वारे तपासावे आणि बालिकेच्या संरक्षणासाठी बाल कल्याण समितीची मदत घ्यावी. यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ तसेच पोलीस आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.
Source: Cosmo News Desk











