नाशिक | संविधान दिनानिमित्त कार्यक्रम सुरू असतानाच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी (दि. २६) प्राप्त झाला. या ई-मेलमुळे न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली होती. न्यायालयाचा सहावा मजला उडवून देण्याचा इशारा या ई-मेलद्वारे देण्यात आला. एका महिन्याच्या कालावधीत न्यायालयाला धमकीचा मेल मिळण्याची ही दुसरी घटना असल्याने न्यायालय प्रशासनासह पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. या प्रकारामुळे न्यायालयातील कर्मचारी, वकील आणि पक्षकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर या धमकीच्या ई-मेलची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली.
पोलिस व सुरक्षा पथकांची कारवाई
माहिती मिळताच न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याची कल्पना दिली. पोलीस पथक तात्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वानपथकाला पाचारण केले. पोलिसांनी तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील कर्मचारी आणि नागरिकांची इमारतीबाहेर पडण्यासाठी धावपळ उडाली. अनेक कर्मचारी घाईघाईने इमारतीबाहेर आले. पोलिसांनी न्यायालयाच्या सहाव्या मजल्यासह संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली. पार्किंगस्थळ, प्रतीक्षालय, विविध कोर्ट रूम, लिफ्ट, जिने आणि न्यायालय आवारातील टपालपेटीचीही झडती घेण्यात आली. प्रत्येक संशयास्पद ठिकाणी बारकाईने तपासणी करण्यात आली.
कामकाज विस्कळीत व तपास सुरू
न्यायालयात दररोज मोठ्या संख्येने न्यायाधीश, वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. या कसून तपासणीमुळे न्यायालयाचे कामकाज सुमारे तासभर काही प्रमाणात विस्कळीत झाले. महिन्यातभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यामुळे न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे न्यायालयीन कामकाज आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, धमकीचा ई-मेल कोठून पाठविण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि हा केवळ खोडसाळपणा आहे की एखादा गंभीर कट, या सर्व बाजूने पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
Source: Cosmo News Desk







