नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हृषिकेश भगवान खराटे (वय ४०, रा. एम.एच.बी. कॉलनी, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या कारवाईमुळे सातपूरमधील मारहाण प्रकरणाचा तपास वेगात सुरू झाला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मारहाणीची घटना आणि गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी २ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४० च्या सुमारास सातपूर कॉलनी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोर उभे होते. त्या वेळी संशयित हृषिकेश खराटे याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी हातोड्याने मारहाण केली आणि फिर्यादीला गंभीर जखमी केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित हृषिकेश खराटे हा फरार झाला होता.
गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी आणि अंमलदार या प्रकरणाचा शोध घेत असताना, संशयित हृषिकेश खराटे हा सातपूरगाव कमानीजवळ असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय सानप व पोलिस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सातपूर गाव कमानीजवळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक संजय सानप, यशवंत बेंडकोळी, हवालदार चंद्रकांत गवळी, पोलिस अंमलदार प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले आणि तेजस मते यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
Source: Cosmo News Desk






