नाशिक | सातपूर औद्योगिक वसाहतीमधील बॉश लिमिटेड कंपनीने बेकायदा कामावरून कमी केलेल्या २३५ कामगारांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी प्रत्येक कामगाराला २५ लाख रुपये देऊन सेवेतून सन्मानपूर्वक निवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत. या न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कंपनीवर सुमारे ६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असून कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रदूषणविषयक निकषांमुळे उत्पादन कमी आणि बेकायदा कपात
बॉश लिमिटेड कंपनीच्या सातपूर कारखान्यात हे कामगार सुमारे १० वर्षांपासून ‘न्यू एंट्रंट टेम्पररी वर्कर’ (एनईटीडब्ल्यू) म्हणून काम करत होते. वाहनांचे सुटे भाग उत्पादित करणाऱ्या या कारखान्यात मारुती सुझुकी आणि फोर्ड इंडियाच्या डिझेल वाहनांसाठी सुटे भाग तयार केले जात होते. परंतु, कडक प्रदूषणविषयक निकषांमुळे डिझेल वाहनांचे उत्पादन बंद झाल्यानंतर कारखान्यातील काम कमी झाले. त्यानंतर कंपनीने ‘रेड लाइट अॅक्टिव्हेशन’ योजना आणून कामगारांना कामाविना घरी बसवण्यास सुरुवात केली होती. या निर्णयाविरोधात कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालय आणि उच्च न्यायालयात कायदेशीर लढा दिला.
उच्च न्यायालयाचा सुधारित आदेश आणि नुकसानभरपाईचा मार्ग
कंपनीने ७ सप्टेंबर २०२४ रोजी एकाच दिवशी सुमारे ५०० कामगारांच्या महाराष्ट्राबाहेर बदलीचे आदेश काढले होते. यातील २३५ कामगारांच्या युनियनने या निर्णयाविरोधात औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कंपनीची कृती बेकायदा ठरवून कामगारांना पुन्हा नाशिक कारखान्यात रुजू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत, कामगारांना पुन्हा कामावर घेण्याऐवजी प्रत्येक कामगाराला २५ लाख रुपये देऊन कायमस्वरूपी मुक्त करण्याचा सुधारित आदेश दिला आहे.
Source: Cosmo News Desk






