नाशिक | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिंहस्थ कुंभपर्व हा केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्री, साधू-महंत आणि मान्यवर उपस्थित होते. सुमारे १४०० वर्षांपूर्वीपासून लोक मोठ्या श्रद्धेने अशा आयोजनांमध्ये सहभागी होत असल्याचे ऐतिहासिक नोंदींवरून स्पष्ट होते, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
धर्मध्वजारोहण आणि कुंभगीताचे अनावरण
या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंभगीत आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रामतीर्थ व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचनही करण्यात आले. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करताना साल्हेर किल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील हजारो जनजाती बांधव सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
विकासकामे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की, आगामी सिंहस्थासाठी सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून परिसरात सुरू असलेली सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे भविष्याला नवी दिशा देतील. दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रपतींनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपत केंद्र व राज्य सरकार त्यांना आवश्यक मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. कुंभपर्वाला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची जोड देऊन नवा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.
Source: Cosmo News Desk







