मुंबई | पथविक्रेत्यांच्या उपजीविकेला बळकटी देणे, संस्थात्मक कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे आणि डिजिटल आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला “पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६” मध्ये एकूण पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये राज्याला दोन पुरस्कार मिळाले असून, महाराष्ट्रातील तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्जवितरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील डाॅ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा डंका
गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्यास पीएम स्वनिधी कर्जवितरणात प्रथम क्रमांक, तर डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटात एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परभणी महानगरपालिकेने कर्जवितरणात प्रथम क्रमांक मिळविला. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परळी नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला, तर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने तृतीय क्रमांक मिळविला. राज्य शासन, नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बँकिंग क्षेत्रातील संस्था आणि इतर घटकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले आहे.
पीएम स्वनिधी योजनेचा विस्तार
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही केंद्रीय क्षेत्रातील योजना असून केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जून २०२० मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेमार्फत पथविक्रेत्यांना विनातारण परवडणारे खेळते भांडवल कर्ज दिले जाते. सप्टेंबर २०२५ मध्ये योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पुनर्रचना करून त्याची मुदत मार्च २०३० पर्यंत वाढवण्यात आली आहे. या विस्तारित योजनेमध्ये पथविक्रेत्यांचा सामाजिक व आर्थिक विकास साधण्यावर भर देण्यात आला असून वाढीव कर्ज टप्पे, रुपे क्रेडिट कार्ड, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर लाभ, तसेच ‘स्वनिधी से समृद्धी’ उपक्रमाद्वारे सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी केली जाते. पथविक्रेत्यांची ओळख, नोंदणी आणि कौशल्य प्रशिक्षण देखील यात समाविष्ट आहे.
Source: Cosmo News Desk









