नाशिक | दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती आपत्कालीन क्रमांक ११२ वर देऊन पोलिसांची दिशाभूल करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवार (दि. २१) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
डायल ११२ वर खोटा कॉल
उमराळे बु. दूरक्षेत्र येथे हवालदार दशरथ साबळे व हवालदार मोरे हे डायल ११२ वर कर्तव्यावर असताना शनिवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी बोराचा पाडा येथे महिलेचा खून झाल्याचा कॉल आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कॉलरच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी कॉलरने त्याची पत्नी गंगुबाई पुंडलिक डाबल हिचा विळवंडी शिवारात खून झाल्याची माहिती दिली. यामुळे पोलिस पथक तातडीने विळवंडीकडे रवाना झाले आणि सरपंच विष्णू वाघेरे यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.
पोलिसांची दिशाभूल केल्याने गुन्हा दाखल
घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी चौकशी केली असता, कॉल करणाऱ्याने त्याचे नाव पुंडलिक काशिनाथ डाबल (वय ३८, रा. विळवंडी, ता. दिंडोरी) असल्याचे सांगितले. त्याने मित्राचा, म्हणजेच रामदास सुखदेव मांडे (रा. सोनगाव, ता. दिंडोरी) याच्या मोबाइलवरून हा कॉल केल्याचे उघडकीस आले. किरकोळ घरगुती भांडणानंतर पत्नी मुलांसह मामाच्या गावी निघून गेल्याची कबुली त्याने दिली. सरपंच व साक्षीदारांच्या उपस्थितीत खातरजमा केल्यानंतर गंगुबाई व तिची मुले मामा रमेश पानडगळे (रा. कचरपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्याकडे सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने आपत्कालीन सेवेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी हवालदार साबळे यांच्या फिर्यादीवरून पुंडलिक डाबलवर गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk





