नाशिक | मैत्री आणि जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस झपाट्याने वाढले आहेत. उच्चशिक्षित तरुण, व्यावसायिक, उद्योजक तसेच ज्येष्ठ नागरिकही सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे निदर्शनास आले आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दर सात व्यक्तींपैकी एक व्यक्ती डेटिंग ॲपच्या माध्यमातून पैसे गमावत असल्याचे समोर आले आहे.
डेटिंग ॲपवरील फसवणुकीचे विविध प्रकार
फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल माध्यमांवर आकर्षक जाहिराती करून नागरिकांना या ॲप्सकडे आकर्षित केले जाते. सुरुवातीला साध्या गप्पा आणि मैत्रीने सुरू झालेला संवाद पुढे प्रेमसंबंध किंवा आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचतो. यामध्ये फेक प्रोफाइलद्वारे फसवणूक, रोमान्स स्कॅम, गुंतवणुकीचे आमिष, हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग, कफे बिल आणि प्रत्यक्ष भेटीतील फसवणूक तसेच बनावट ॲप आणि लिंकद्वारे फसवणूक केली जाते. पुण्यात एका ५३ वर्षीय उद्योजकाची ७ कोटी ७ हजार ६१ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवरील २०२५ च्या आकडेवारीनुसार, बनावट व्यक्तिमत्त्व किंवा प्रोफाइलच्या माध्यमातून फसवणुकीच्या ४६ हजार ७८४ घटना नोंदवण्यात आल्या.
फसव्या डेटिंग ॲपपासून सावध राहण्याचे उपाय
अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरमधूनच ॲप डाउनलोड करावे. अनोळखी व्यक्तीला पैसे, बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा यूपीआय पिन कधीही देऊ नये. केवळ ऑनलाइन ओळख असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठेही गुंतवणूक करू नये. खाजगी छायाचित्रे, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करणे टाळावे आणि पहिली भेट नेहमी सार्वजनिक ठिकाणी घ्यावी. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk





