मुंबई | महाराष्ट्राला चित्रपट चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटनाचे प्रमुख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या ४९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा करार झाला असून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कराराचे आदान-प्रदान सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
चित्रपट पर्यटनाचा प्रसार आणि ब्रँडिंग
पाच वर्षांच्या या करारांतर्गत ‘महाराष्ट्र चित्रपट पर्यटन’ या स्वतंत्र ब्रँडची निर्मिती करून एकसमान दृश्यात्मक ओळख विकसित केली जाणार आहे. या ब्रँडचा प्रचार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पर्यटनविषयक बाजारपेठा, प्रदर्शने तसेच रोड शोजच्या माध्यमातून संयुक्तपणे करण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील विविध पर्यटनस्थळांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. महामंडळाच्या फिल्म सेलमार्फत ओळखण्यात आलेल्या चित्रीकरण स्थळांवर प्रमाणित स्मृतिफलक, माहिती फलक आणि सेल्फी पॉइंट्स विकसित केले जातील. डिजिटल माहिती प्रणालीद्वारे संबंधित स्थळांवर चित्रित झालेल्या चित्रपटांची प्रमाणित माहिती, ऐतिहासिक संदर्भ आणि परिसरातील पर्यटन आकर्षणांची माहिती दिली जाईल. चित्रपट आणि पर्यटन क्षेत्रातील माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी बहुभाषिक डिजिटल माहिती संग्रह विकसित करण्यात येणार आहे.
ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
चित्रपट पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार, निवास, वाहतूक, खानपान, हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीला नव्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि अपरिचित पर्यटनस्थळांच्या विकासाला यामुळे गती मिळेल. चित्रपट पर्यटनाला सांस्कृतिक आणि ग्रामीण क्षेत्राशी जोडण्यासाठी ‘लोकोत्सव’ महोत्सवाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रस्तावित असून यात प्रादेशिक खाद्यसंस्कृती, लोककला, चित्रपट महोत्सव आणि सार्वजनिक चित्रपट प्रदर्शनांचा समावेश असेल. राज्यातील योग्य कृषी पर्यटन केंद्रे आणि खासगी ग्रामीण पर्यटनस्थळांची ओळख पटवून त्यांचा महामंडळाच्या सिंगल विंडो प्रणालीमध्ये समावेश केला जाईल, ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी स्थळांची माहिती सहज उपलब्ध होईल.
Source: Cosmo News Desk





