नाशिक | दिवाळीचा सण संपताच जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे भाव चढे असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला होता. मात्र, आता अवघ्या पाच दिवसांच्या काळात दरांमध्ये झालेली ही घट ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये ८ नोव्हेंबर (लक्ष्मीपूजन) ते १२ नोव्हेंबर या कालावधीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम आणि चांदी प्रतिकिलो ३ हजार रुपयांनी खाली आली आहे.
सुरुवातीला होते उच्चांकी दर
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार रुपये होता, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ७० रुपये नोंदवला गेला होता. तसेच चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ८८ हजार रुपये इतका होता. दिवाळीच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली. २४ कॅरेट सोने ८०० रुपयांनी वाढून १ लाख ४२ हजार ८०० रुपयांवर पोहोचले, तर २२ कॅरेट सोने १ लाख ३० हजार ८०० रुपयांवर गेले. १० नोव्हेंबर रोजी चांदीने उच्चांक गाठत १ लाख ९० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
भाऊबीजेनंतर बाजारात बदल
भाऊबीजेनंतर म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी बाजारातील चित्र अचानक बदलले. ११ नोव्हेंबरला सोन्याच्या दरात १ हजार ३०० रुपयांची घट झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याचे दर २ हजार ५०० रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल ५ हजार रुपयांनी कमी झाले. आता दिवाळी संपल्यानंतर तुळशी विवाह आणि आगामी लग्नसराई सुरू होत आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण पाहता, जळगावच्या सुवर्णपेठेत दागिन्यांच्या आगाऊ नोंदणीसाठी ग्राहक पुन्हा वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source: Cosmo News Desk





