Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक जिल्हा बँकेचे २१ कोटी ३२ लाख रुपये दशकभरापासून अडकले
Nashik

नाशिक जिल्हा बँकेचे २१ कोटी ३२ लाख रुपये दशकभरापासून अडकले

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) छातीवर त्या निर्णयाचा घाव आजही ताजा आहे. नोटबंदीच्या एका रात्रीतून बँकेच्या तिजोरीत बंदिस्त झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या तब्बल २१ कोटी ३२ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आजही बँकेच्या स्ट्रॉगरूममध्ये पडून आहेत. गेल्या दशकभरात या अडकलेल्या रकमेवर अंदाजे चार टक्के दराने वर्षाला ८५ लाख रुपयांप्रमाणे साडेआठ कोटी रुपयांहून अधिक व्याजाचे थेट नुकसान बँकेला सहन करावे लागले आहे. आधीच आर्थिक संकटाच्या गर्तेत आणि डबघाईला आलेल्या नाशिक जिल्हा बँकेला या नोटांचा कोट्यवधींचा तोटा आणि सुरक्षेचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

आरबीआयचा नकार आणि व्याजाचे नुकसान

दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला बँकांकडून ताळेबंद मागवून इतर बँकांच्या नोटा स्वीकारल्या. मात्र, नाशिक जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनी बदलून घेतलेल्या २१.३२ कोटी रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) थेट आक्षेप घेत, त्या स्वीकारण्यास साफ नकार दिला. आरबीआयच्या या दणक्यामुळे ही रक्कम गेल्या १० वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत कागदाचे तुकडे ठरून पडून आहे. नाशिक जिल्हा बँक शेतकरी कर्जवसुली, थकबाकी आणि एनपीएच्या गर्तेत अडकली असताना, या २१.३२ कोटी रुपयांमुळे बँकेचे दरवर्षी अंदाजे ८५ लाख रुपयांचे व्याज बुडत आहे.

न्यायालयीन लढा आणि केंद्राकडे विनंती

नोटा बदलून मिळाव्यात म्हणून २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात लढताना बँकेचे ५५ लाख रुपये वकिलांच्या शुल्कापोटी खर्च झाले, त्यानंतर हा खर्च वाढला. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे निर्देश दिले. त्यानंतर नाशिकसह अडचणीत सापडलेल्या आठ जिल्हा बँकांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे संयुक्त प्रस्ताव पाठवून या नोटा बदलून देण्याची अंतिम याचना केली आहे. नोटबंदीनंतर राज्यातील ३१ जिल्हा बँकांनी ५,२८८ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या होत्या, त्यापैकी बहुतांश रक्कम बदलून मिळाली, परंतु ८ प्रमुख जिल्हा बँकांमधील रक्कम अद्याप अडकलेली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts