नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे एका १८ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या चुलतभावाने पोलिसात फिर्याद दाखल केली असून, परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हत्येची नेमकी घटना कशी घडली?
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वरपासून जवळ असलेल्या सापगाव येथील आर्यत सोमनाथ कांबळे (वय १८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आदित्य एकनाथ मोंढे याने त्याच्या बहिणीसोबत आर्यतचे प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरला होता. यादरम्यान, संशयित आदित्याने आर्यतला समझावून सांगतो असे म्हणून सापगाव रस्त्यावर स्मशानभूमीलगत नेले. तिथे शिरसगाव येथील संशयित आदित्यने आर्यतच्या पोटावर डाव्या बाजूला धारदार चाकू भोसकला. तसेच गळ्यासह छाती व हातावर वार केले. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आर्यतचा मृत्यू झाला.
वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या हल्ल्यादरम्यान जखमी आर्यटने मदतीसाठी आराडाओरडा केला असता, बाजूला थांबलेले त्याचे सोबती व चुलतभाऊ घटनास्थळाकडे धावत गेले. मात्र, चाकूचे वार करणारा आदित्य याने ‘आपण जे करायचे ते केले आहे’, असे म्हणत तेथून पळ काढला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या आर्यतला तत्काळ उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या गुरुवारी एकादशी होती. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत फेरीमार्गावर निवृत्तिनाथांची पालखी घेऊन गेलेले वारकरी चालत होते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर अशा प्रकारे खुलेआम चाकूहल्ले झाल्याने फेरीमार्गावरील वारकरी भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Source: Cosmo News Desk





