नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळत असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील महत्त्वाची कामे रखडल्याचे चित्र समोर आले आहे. निधी वाटपातील या कथित दुजाभावामुळे महायुतीअंतर्गत राजकीय असंतोलाची चर्चा सुरू झाली आहे.
ओझर ते शिर्डी रस्ता रखडल्याची चर्चा
नाशिकमधील ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा सुमारे २१० कोटी रुपये खर्चाचा आणि १० मीटर रुंदीचा प्रस्तावित रस्ता याचे महत्त्वाचे उदाहरण ठरतो. हा मार्ग निफाडचे आमदार दिलीप बनकर, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातून जातो. हा प्रकल्प कुंभमेळ्यासाठी शिर्डी, मराठवाडा आणि विदर्भाकडून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप अपेक्षित मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधी मिळत नसल्याबाबत पक्षनेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा यापूर्वी झाली होती.
भाजप आमदारांच्या रस्त्यांसाठी निधी
दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील चार रस्त्यांसाठी ५८.६० कोटी रुपये, तर चांदवड-लासलगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७५.८२ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चांदवड मतदारसंघात भाजप आमदार राहुल आहेर आहेत. या कामांचा कुंभमेळ्याशी थेट संबंध दिसत नसल्याने निधी वाटपाच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्तेत सहभाग असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना विकासकामांसाठी संघर्ष करावा लागत आहे का, असा सवाल उपस्थित होत असून ओझर-शिर्डी मार्गाला मंजुरी कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
Source: Cosmo News Desk






