Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये व्हीव्हीआयपींचा राबता; कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप
Nashik

नाशिकमध्ये व्हीव्हीआयपींचा राबता; कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

नाशिक | सायरनचा गजर, वेगाने धावणारी वाहनांचे ताफे, चौकाचौकात खाकी वर्दीचा पहारा आणि प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर यामुळे संपूर्ण नाशिक शहराला हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. धर्मध्वजारोहण सोहळा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात व्हीव्हीआयपी मूव्हमेंटचा मोठा धडाका सुरू होता. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमुळे ३१ ऑक्टोबरचा धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला असून, या निमित्ताने नाशिककरांना एका व्हीव्हीआयपी शहरात वावरत असल्याचा अनोखा अनुभव मिळाला.

सुरक्षा यंत्रणा आणि वाहतुकीचे विशेष नियोजन

राष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे सुरक्षेचे सर्वोच्च स्तर आणि प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात आले. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी प्रमुख मार्गांवर सुरक्षा वाहनांची वर्दळ, पोलिसांची धावपळ आणि सायरनचे आवाज सतत ऐकू येत होते. प्रमुख चौक, महामार्ग, कार्यक्रमस्थळ आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात आली. व्हीव्हीआयपींचे ताफे मार्गस्थ होत असताना वाहतुकीचे नियोजन तात्पुरते बदलले जात होते. वाहनांचे ताफे मार्गस्थ होताना काही काळ वाहतूक थांबविण्यात येत होती आणि सायरनाचा आवाज ऐकताच नागरिकांचे लक्ष रस्त्याकडे वळत होते.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम

धर्मध्वजारोहणामुळे आगामी कुंभमेळ्याचे वर्ष अधिकृतपणे सुरू झाले असून, भविष्यात विविध मान्यवरांचे दौरे, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची आव्हाने कायम राहणार आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून भाविक, पर्यटक आणि मान्यवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांतील हे व्हीव्हीआयपी वातावरण आणि सुरक्षा यंत्रणांचे शहरभर पसरलेले कवच म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जणू रंगीत तालीमच ठरली आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिककरांच्या दैनंदिन अनुभवात मोठी भर पडली.

Source: Cosmo News Desk

Related Posts