मुंबई | इतिहासाचे वाचन व लेखन करताना केवळ ऐतिहासिक घटनांपुरते मर्यादित न राहता त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लेखक व वरिष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांनी केले आहे. मुंबई पुस्तक महोत्सवात ‘जीवन आणि वारसा’ या सत्रात संवादक मूर्तझा अली खान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या सत्रात पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याचा तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि शिवकालीन अर्थव्यवस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकारяविषयी माहिती देताना त्यांनी अफझलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगाचे सविस्तर विवेचन केले. या घटनेच्या अनुषंगाने तत्कालीन राजकीय परिस्थिती, १७ व्या शतकातील फारसी भाषेतील ऐतिहासिक संदर्भ आणि महाराजांचे व्यक्तिमत्त्व यांचे विविध पैलू उलगडले. महाराजांचा दूरदृष्टीचा आणि सजग दृष्टिकोन, प्रशासनातील बारकावे तसेच राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेल्या ‘राज्यव्यवहारकोशा’चे महत्त्व त्यांनी विशद केले. शिवकालीन आर्थिक परिस्थिती, दुष्काळ, महसूल व्यवस्था आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन यांसारख्या विषयांची माहिती देत इतिहासाचा अभ्यास करताना तत्कालीन प्रशासन आणि आर्थिक व्यवस्थेचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळक व विविध व्यक्तिमत्त्वांवरील लेखन
लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावरील लेखनाचा संदर्भ देताना पुरंदरे यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या घोषणेचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकसहभाग, जनजागृती तसेच ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी सर्वसामान्य जनतेशी साधलेला संवाद याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, एडॉल्फ हिटलर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या विविध व्यक्तिमत्त्वांवर लेखन केले आहे. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
Source: Cosmo News Desk











