Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सैनिकांचा त्याग आणि संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा: डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा
Maharashtra

सैनिकांचा त्याग आणि संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवा: डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा

मुंबई पुस्तक महोत्सवात संवाद साधताना डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा

मुंबई | सैनिकांचे शौर्य व त्याग, भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध समाजसेविका, लेखिका आणि कवयित्री डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात सुरू असलेल्या मुंबई पुस्तक महोत्सवात ‘हिंदुत्व, भारत, संस्कृती’ या विषयावर आयोजित संवाद सत्रात त्या बोलत होत्या. लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या डॉ. लोढा यांच्याशी श्रीमती दैवता पाटील यांनी या सत्रात संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी आपल्या लेखनप्रवासाचे अनुभव, सैनिकांप्रती कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली परंपरेवर आपले विचार मांडले.

लेखनप्रवासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रती कृतज्ञता

‘ऐ मेरे वतन के लोगों’ या अजरामर गीताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त लोढा फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून आपल्या लेखनप्रवासाला प्रेरणा मिळाल्याचे डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, कवी प्रदीप यांची कन्या तसेच परमवीर चक्र व शौर्य पुरस्कार विजेते जवान उपस्थित होते. सैनिकांच्या आशीर्वादातून त्यांच्या शौर्यगाथा व त्याग भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तके लिहिण्याचा संकल्प आपण केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रतिकूल हवामानात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. जवान दिसताच सन्मानाने उभे राहणे, टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा गौरव करणे आणि वर्षातील एखादा सण त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरा करणे याद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले. सीमेवर तैनात जवानाची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबीयांच्या भावना व्यक्त करणारी भावस्पर्शी कविताही त्यांनी या वेळी सादर केली.

वैदिक संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचे स्मरण

भारताची वैदिक संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि ऐतिहासिक वारसा जगाला अभिमान वाटावा असा आहे, असे सांगत डॉ. लोढा यांनी महर्षी कणाद, सुश्रुत, आर्यभट्ट, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लक्ष्मी सहगल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या योगदानाची माहिती दिली. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे कार्य नव्या पिढीला समजणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. युवा पिढीशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येकाने मोठी स्वप्ने पाहावीत, चेहऱ्यावर हास्य ठेवावे आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवावा, असे सांगितले. प्रत्येकामध्ये एक कवी किंवा लेखक दडलेला असून त्याला लेखणी आणि कागदाची जोड देऊन अभिव्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. सैनिकांच्या शौर्याचा सन्मान, भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय या त्रिसूत्रीतून सक्षम, संवेदनशील आणि देशप्रेमी युवा पिढी घडविण्याचा संदेश या संवादातून देण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts