Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुंबई पुस्तक महोत्सवात बालचहूंसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
Maharashtra

मुंबई पुस्तक महोत्सवात बालचहूंसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई पुस्तक महोत्सवातील चिल्ड्रन्स कॉर्नरमधील उपक्रमांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी

मुंबई | मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ च्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये विविध शैक्षणिक, मनोरंजक आणि सर्जनशील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये विज्ञानाच्या गमतीजमती, कठपुतळी कार्यशाळा, ‘जस्ट अ मिनिट’ भाषण स्पर्धा आणि मातीची खेळणी तयार करण्याच्या कार्यशाळेचा समावेश होता. या सर्व उपक्रमांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विज्ञानाच्या गमतीजमती आणि कठपुतळी कार्यशाळा

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान लेखक राजीव तांबे यांनी ‘विज्ञानाच्या गमतीजमती’ या विषयावर मुलांशी संवाद साधला. त्यांनी गोष्टींच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना रंजक पद्धतीने मांडल्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याशिवाय, चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट दहा विद्यार्थ्यांना राजीव तांबे यांच्या हस्ते पुरस्कार आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सत्रात पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी ‘वर्कशॉप ऑन पपेट्री’ ही कठपुतळी कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये मीना नायक यांनी विद्यार्थ्यांना कठपुतळीचे विविध प्रकार आणि तंत्र शिकवले.

भाषण स्पर्धा आणि मातीची खेळणी कार्यशाळा

तिसऱ्या सत्रात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जस्ट अ मिनिट’ भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांका माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्वकलेचे महत्त्व आणि प्रभावीपणे विचार मांडण्याबाबत मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मातीची खेळणी बनविण्याची कार्यशाळा पार पडली. सौरभ अली यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून खेळणी तयार करण्याचे तंत्र शिकवले, ज्यायोगे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक खेळणी तयार केली. एनबीटी-एनसीसीएलचे संपादक दीप सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विविध सत्रांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नवनवीन अनुभव घेतले आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts