Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • जीवनात यशासाठी मूल्ये आणि समाजसेवा महत्त्वाची: गोविंद ढोलकिया
Maharashtra

जीवनात यशासाठी मूल्ये आणि समाजसेवा महत्त्वाची: गोविंद ढोलकिया

मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये संवाद साधताना गोविंद ढोलकिया

मुंबई | जीवनात यश संपादन करण्यासाठी आर्थिक संपत्तीपेक्षा सुंदर स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन, जीवनमूल्ये आणि समाजाप्रती कृतज्ञता या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. उद्योजक आणि राज्यसभा सदस्य गोविंद ढोलकिया यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात सुरू असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ या महोत्सवात ‘मूल्ये, दृष्टी आणि विजय’ या विषयावर आयोजित संवादात आपले विचार मांडले. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या विशेष कार्यक्रमात ढोलकिया यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव, जीवनप्रवास आणि समाजसेवेचे कार्य यावर प्रकाश टाकला.

कर्मचाऱ्यांशी आपलेपणाचे नाते आणि व्यवस्थापन

आपल्या व्यावसायिक वाटचालीविषयी बोलताना गोविंद ढोलकिया यांनी एसआरके कंपनीतील सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांना संस्थेची खरी ताकद असल्याचे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना केवळ कामगार न मानता कुटुंबातील सदस्य मानून त्यांच्याशी जवळीक साधली जाते. त्यांच्यासोबत एकत्र भोजन करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तसेच कुटुंबाच्या आरोग्यविषयक अडचणींची काळजी घेणे यांमुळे संस्थेमध्ये विश्वासाचे आणि आपलेपणाचे वातावरण तयार झाले आहे. कर्मचाऱ्यांशी जपलेले हेच नाते संस्थेच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. संपत्ती किंवा पदापेक्षा कर्मचाऱ्यांशी निर्माण झालेले आपुलकीचे नाते अधिक मोलाचे असते.

सामाजिक बांधिलकी आणि तरुणांचा सहभाग

समाजाकडून मिळालेल्या यशाची परतफेड समाजसेवेच्या माध्यमातून केली पाहिजे, असे सांगत त्यांनी आदिवासी भागांतील वैद्यकीय शिबिरे, रुग्णालय उभारणी, तसेच गावोगावी मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती दिली. लोकसहभागातून समाजोपयोगी कामे उभी राहू शकतात, यावर त्यांनी विशेष भर दिला. तरुणांना केवळ उपदेश देण्याऐवजी त्यांना विविध गावांमध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिल्यास त्यांच्यात अनुभवातून शिकण्याची आणि व्यापक दृष्टिकोन विकसित करण्याची क्षमता निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले. सुंदर स्वभाव आणि सेवाभावी वृत्तीमुळेच प्रगतीच्या अनेक संधी मिळतात, असा संदेश त्यांनी या संवादातून दिला.

Source: Cosmo News Desk

Related Posts