मुंबई | फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे पूर्ण करावे. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित वेळेत कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार, बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल एप्रिल २०२७ अखेर जाहीर करण्याचे नियोजन आहे. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान, तर दहावीची परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतली जाईल. दुष्काळग्रस्त घोषित ३१० तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या १५ लाख २८ हजार ६२७ विद्यार्थ्यांना सुमारे ९६ कोटी २७ लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी मिळणार असून, यात दहावीचे ८ लाख ५२ हजार ४९६ आणि बारावीचे ६ लाख ७६ हजार १३१ विद्यार्थी समाविष्ट आहेत. पूर्वी शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परीक्षा केंद्र आणि सुरक्षा व्यवस्था
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बारावीची ३ हजार ३३२ आणि दहावीची ४ हजार ९९७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी बारावीकरिता ५०६ आणि दहावीकरिता ५२५ परिरक्षक केंद्र ठरवण्यात आली असून, तिथे चोवीस तास पोलीस संरक्षण व सीसीटीव्ही व्यवस्था असणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता समित्यांमार्फत देखरेख ठेवण्यात येईल. जानेवारी २०२७ मध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत जनजागृती सप्ताह होईल. संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके आणि ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार असून परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील. प्रश्नपत्रिकांचे डिजिटल वितरण, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मूल्यमापनाला प्राधान्य दिले जात असून, राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यातील निवडक विषयांच्या उत्तरपत्रिका कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तपासण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण मिळावे यासाठी मंडळाचे १० आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ३०० समुपदेशक उपलब्ध असतील. तसेच ‘टेली मानस’ (१४४१६) आणि ‘मनोदर्पण’ (८४४८४४०६३२) या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. नियमित विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत परीक्षा आवेदनपत्रे सादर करावीत आणि सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source: Cosmo News Desk










